सीमेवर देशसेवा करताना वीरमरण आलेल्या मेजर प्रसाद महाडिक यांच्या पत्नी गौरी यांनी लष्करात जाण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. पात्रता परीक्षा आणि शारीरिक तंदुरुस्ती हे दोन निकष पूर्ण केले की त्या लष्करात जाऊ शकणार आहेत. गौरी सध्या बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहेत.
शहीद मेजर प्रसाद महाडिक पत्नी गौरीसह विरार येथे राहत होते. काही काळ बँकेत नोकरी केल्यानंतर प्रसाद भारतीय लष्करात दाखल झाले होते. १० ऑक्टोबरपासून ते अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे कार्यरत होते. या भागात तापमान उणे अंशात असते. तेथे ऊब मिळण्यासाठी हीटरचा वापर केला जातो. ३० डिसेंबरच्या पहाटे रॉकेलचे हीटर कलंडून लागलेल्या आगीत महाडिक यांचा मृत्यू झाला. २ जानेवारीला विरार येथील निवासस्थानी त्यांचा मृतदेह आणण्यात आला आणि विरार येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गौरी यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. मात्र, खचून न जाता मेजर प्रसाद यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गौरी यांनी लष्करात जाण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
लष्करात जाण्याची इच्छा आहे. त्यासाठी कुटुंबीयांचा पाठिंबाही आहे. निकष पूर्ण केल्यानंतर लष्करात भरती होईन.
– गौरी महाडिक
