मन्नत… सुपरस्टार शाहरुख खानचा हा बंगला… काही दिवसांपूर्वी हा बंगला इतका चर्चेत आला की तो ट्विटरवर टॉप ट्रेंडिंगमध्ये पोहोचला आणि त्यामागचं कारण होतं मन्नतच्या भिंतीवर एका चाहत्याने रंगवलेली ग्राफिटी.
खरंतर प्रचंड बंदोबस्त असलेल्या या बंगल्याच्या भिंती कोणाच्याही लक्षात न येऊ देता रंगवणं अगदीच अशक्य. पण ते काम गौरव नावाच्या फॅनने करुन दाखवलं. चाहत्याची ही करामत किंग खानपर्यंत पोहोचली आणि त्याने ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली. ‘या प्रकाराने मला धक्का बसला आहे’ अशी प्रतिक्रिया शाहरुख खानने दिली.
पण या सगळ्यात गौरव नेमका आहे तरी कोण? आणि सी यू ऑन 15 म्हणजे नेमकं काय? आणि इतका बंदोबस्त असुनही त्याने हा उद्योग कसा केला हा प्रश्न कायम होता. ह्या प्रश्नांची उत्तरं शाहरुख खानच्या ‘फॅन’ या आगामी सिनेमाच्या टीझरमध्ये मिळतात.
फॅन’ हा सिनेमा 15 एप्रिल 2016 ला रिलीज होणार आहे. ‘सी यू ऑन 15th’चा संबंध थेट याच प्रदर्शनाच्या तारखेशी आहे. टीझरमधलं वाक्य नीट कान देऊन ऐकल्यास गौरव हे नाव स्पष्टपणे ऐकू येतं. गौरव हेच नाव मन्नतच्या भिंतीवर लिहीलेलं आहे. हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही.
थोडक्यात मन्नतच्या भिंतीवर कोरलेली ही सगळी ग्राफिटी हा फक्त आणि फक्त एक पब्लिसिटी स्टंट होता. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा आपल्याला शॉक बसला असल्याचं शाहरुख म्हणाला होता मात्र हा प्रकार उघडकीस आल्यावर आता तुम्हाला शॉक बसला असेल.

