बँकेतून दिवसाढवळ्या १० लाखांची रोकड लंपास

भिवंडी येथील मर्कन्टाइल सहकारी बँकेत दिवसाढवळ्या घुसून बँक कर्मचाऱ्यांच्या नकळत दोन चोरटय़ांनी कॅशियरच्या खणातून तब्बल १० लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
भिवंडी शहरातील तीनबत्ती नाका, कोटरगेट नाका येथील मर्कन्टाइल बँकेच्या शाखेत बँक चालू असतानाच कर्मचाऱ्यांच्या नकळत दोन अज्ञात चोरटय़ांनी १० लाखांची रोकड लांबवली आहे. यातील हे दोन्ही चोरटे बँकेच्या आवारात शनिवारी सकाळी घुटमळत होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एकाने बँकेत प्रवेश केला व दुसरा बाहेरील पॅसेजमध्येच घुटमळत राहिला. बँकेचे कॅशियर गयाप्रसाद शर्मा हे या वेळी कामानिमित्त बँक व्यवस्थापकांच्या दालनात गेले असता, आत शिरलेल्या चोराने त्यांच्या दालनात प्रवेश मिळवला व कॅशियर यांच्या खोलीत असलेली रोकड घेतली. या खणात तब्बल ५० लाख ४० हजारांची रोकड होती. यापैकी दहा लाखांची रक्कम घेऊन तेथून पोबारा केला. दरम्यान, या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांच्या विरोधात भादंवि कलम ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सी. आर. चव्हाण करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *