‘पुढचं पाऊल’ फेम मराठी अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याच्या धमकीचं एक निनावी पत्र मिळालं आहे. जुईच्या वाढदिवशीच हे पत्र तिला कर्जतच्या घरी एका 8 ते 10 वर्षाच्या मुलाने आणून दिलं. या प्रकरणी जुई गडकरीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सध्या जुई ठाण्यामध्ये राहत असून वाढदिवस साजरा करण्यासाठी ती आपल्या कर्जतच्या घरी गेली होती. याचवेळी तिला हे धमकीचं पत्र मिळालं. वाढदिवस साजरा करताना एक दहा वर्षाच्या मुलाने जुईच्या शेजाऱ्यांना हे पत्र नेऊन दिलं. हे पत्र जेव्हा जुई आणि तिच्या कुटुंबियांना मिळालं तेव्हा त्यांना धक्काच बसला.
या पत्रामध्ये जुईला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “जुईला मी 20 जुलैला संपवून टाकणार आहे. अशी धमकी देण्यात आली आहे. तसेच जर पोलिसांना याबाबत कळविलं तर तुमच्या घरच्यांना देखील मी मारुन टाकेन. असाही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. आमची दुश्मनी फक्त जुईसोबत आहे आणि तिला मारणार लक्षात ठेवा.’ अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. तसेच या पत्राखाली 20/07/2015 अशी तारीखही टाकली आहे.
या प्रकरणी जुईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुढचं पाऊल या मालिकेमुळे घराघरात पोहचलेली जुई सध्या याच मालिकेच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र, या पत्रामुळे तिच्या मनावर चांगलंच दडपण आलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

