पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे यांचा गौरव

मला मिल अग्निकांडात जिवाची पर्वा न करता आत अडकलेल्या अनेकांना सुरक्षितपणे बाहेर काढून जीवदान देणारे पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे यांचा सोमवारी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

हे बचावकार्य सांघिक कामगिरी होती. अग्निशमन दलाच्या जवानांसह अन्य पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी बचाव कार्यात सहभागी होते. त्या सर्वाचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी या वेळी व्यक्त केली.  आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक विरुद्ध दिशेने आपत्कालीन दरवाजाजवळ पोहोचले. त्या पथकासोबत मी होतो. आत अडकलेले या धुरामुळे घुसमटले होते. त्यांना वाट मोकळी करून देण्यात आली. स्ट्रेचर नसल्याने एका महिलेला खांद्यावर घेऊन खाली आलो. अग्निशमन जवानांसोबत आत अडकलेल्या आठ जणांना खाली आणले. मी तिथे एकटा नव्हतो, बचावकार्यात अग्निशमन दलाचे जवान, अन्य पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारीही होते. मी त्या महिलेला खांद्यावर घेऊन खाली आलो, तेथे उपस्थित माध्यम छायाचित्रकाराने माझे छायाचित्र काढले आणि माझे एकटय़ाचे नाव पुढे आले, अशी प्रांजळ कबुली शिंदे यांनी व्यक्त केली.

नोव्हेंबर २०१४ मध्ये शिंदे यांनी वरळी किनाऱ्यावर बुडणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण वाचवले होते. शिंदे हे वरळी पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून काम करतात. कमला मिल अग्निकांड घडले त्या वेळी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी मदतीसाठी अन्य पोलीस ठाण्यांकडे मदत मागितली. त्यानुसार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *