नवी दिल्लीः
दिल्लीसह उत्तर भारतात सलग दुसऱ्या दिवशी आणि नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दाट धुक्यामुळे नागरिकांचे हाल झाले. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक दाट धुके आज दिल्लीत असल्याने दृश्यमानता ५० मीटरपेक्षाही कमी आहे. याचा थेट परिणाम रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीवर झाला आहे. धुक्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डानं उशिराने होत आहेत. तर काही विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
धुक्यामुळे २२० विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. धावपट्टीवर दृश्यमानता अतिशय कमी असल्याने विमानतळावरील वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. १५० विमानांची उड्डाणं उशिराने होत आहेत. ५० विमानांची उड्डाणं वळवण्यात आली आहेत. तर २० विमानांची उड्डाणं रद्द केली गेली आहेत. सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत एकाही विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही. यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर खोळंबून आहेत.
धुक्यामुळे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बहुतेक गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये हजारो प्रवासी अडकले आहेत. रस्ते वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम झाला आहे.
