‘मला धमक्या मिळाल्या तर राजकारणात जाईन’

कमल हसन, सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय प्रवेशाची घोषणा केल्यानंतर आता अभिनेता प्रकाश राज यानेही राजकारणात जाण्याचे संकेत दिले आहेत. ”राजकारणात जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पण मला वारंवार धमकावले तर मी राजकारणात जाईन,” असे राज याने बेंगळुरूतील कार्यक्रमात ठणकावून सांगितले.

प्रकाश राज याने यापूर्वी अनेक मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत बेंगळुरूत झालेल्या कार्यक्रमातही त्याने मोदींवर तोफ डागली. ”राजकारणात जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पण मला वारंवार धमकावले किंवा कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला, तसेच राजकीय आखाड्यात उतरण्याचे आव्हान दिले तर मी राजकारणात जाईन,” असे तो म्हणाला.

सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत राजने केलेल्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य करून तो राजकीय प्रवेशाचे संकेत देत आहे, असे मानले जात आहे. कर्नाटकात याचवर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे निवडणुकांपूर्वी तो काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *