फेसबूक फ्रेंडने केला घात, ‘हार्ट पेशंट’चा बनाव रचत घातला सहा लाखांचा गंडा

फेसबुकवरील मैत्री बेंगळुरुतील एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. इंग्लंडमधील व्यावसायिक असल्याचे भासवत एका भामट्याने बेंगळुरुतील ४८ वर्षीय महिलेला ६ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. दिल्लीतील विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली असून माझी सुटका करण्यासाठी पैसे पाठव असे त्या तरुणाने तक्रारदार महिलेला सांगितले होते.

बेंगळुरुतील नंदिता मोहनराव (वय ४८ वर्ष) या महिलेची फेसबुकवरुन मायकल डेनिस नामक व्यक्तीशी ओळख झाली. मायकलने तो इंग्लंडचा रहिवासी असून त्याने स्वतःचा व्यवसाय असल्याचे सांगितले होते. हळूहळू दोघांचे फेसबुकवरील चॅटिंगचे प्रमाण वाढले आणि त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही शेअर केले. दोघांचे मोबाईलवर बोलणे सुरु झाले. मला ह्रदयविकार असून उपचारासाठी मी भारतात येतोय, असे त्याने नंदिताला सांगितले होते.

२८ नोव्हेंबर रोजी नंदिताला एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने दिल्ली विमानतळावरील कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगितले होते. जान्हवी शर्मा असे नाव तिने नंदिताला सांगितले होते. तुमचा मित्र डेनिसला ५० हजार पाऊंड बाळगल्याप्रकरणी अटक केली असून त्याच्या सुटकेसाठी ५० हजार रुपये पाठवा, असे तिने नंदिताला सांगितले. यानंतर नंदिताला बँक खात्याचा नंबर देण्यात आला आणि नंदितानेही तातडीने त्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. काही वेळाने जान्हवी शर्माने पुन्हा नंदिताला फोन केला आणि आणखी १ लाख ५५ हजार रुपये मागितले. नंदिताने ते पैसे देखील दिले. संध्याकाळी पुन्हा फोन आल्यावर नंदिताने आणखी ४ लाख ८० हजार रुपये त्याच बँक खात्यात जमा केले. २९ नोव्हेंबर रोजी नंदिताला आणखी एका अधिकाऱ्याच्या नावाने फोन केला. यावेळी आरबीआयमधून अश्विनी कुमार नामक अधिकारी बोलतोय असे सांगत त्या व्यक्तीने नंदिताकडे तब्बल साडे आठ लाख रुपयांचे मागणी केली. मात्र, यावेळी नंदिताला या प्रकारावर संशय आला. तिने डेनिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद होता. डेनिसचा फोन सातत्याने बंद येत असल्याने फसवणूक झाल्याची तिची खात्री पटली आणि शेवटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *