औरंगाबादमध्ये पोलीस चौकीत घुसून तरुणांची पोलिसावर दादागिरी!

राज्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका होत असतानाच औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका पोलीस ठाण्यात शिरून काही तरूणांनी पोलीस कर्मचाऱ्यालाच धमकावले. घाटी रूग्णालय पोलीस चौकीत बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

अंकुश टेकाळे यांनी तक्रारीत म्हटल्यानुसार ते रात्रपाळीत कार्यरत असताना अमितकुमार सिंग हा इसम पाडेगाव येथे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना घेऊन तिथे आला. डॉक्टरांना तात्काळ उपचार करायला सांगा, अशा धोशा त्याने लावला होता. त्यावेळी मी त्याला रुग्णालयातील आरएमओला भेटायला सांगितले. मात्र, तुम्ही आम्हाला सहकार्य करत नसल्याचे सांगत अमितकुमारने माझ्याशी हुज्जत घालायला सुरूवात केली. त्यावर डॉक्टरांना उपचार करायला सांगणे माझ्या अधिकारात बसत नसल्याचे मी त्याला सांगितले. तेव्हा, मी दारू पिऊन ड्युटी करत असल्याचा कांगावा करायला त्याने सुरूवात केली. त्याने आपल्या काही मित्रांना फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर या सगळ्यांनी पोलीस चौकीबाहेर शिवीगाळ करायला सुरूवात केली. अमितकुमार सिंग याने कॉलर पकडून मला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. तक्रार लिहून घेण्याचे माझे रजिस्ट्रारही फेकून दिले. तसेच पोलीस आयुक्तांना सांगून नोकरी घालवण्याची धमकी दिल्याचं अंकुश टेकाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी टेकाळे यांनी अमितकुमार अनिलकुमार सिंग आणि त्याच्या इतर मित्रांविरोधात तक्रार दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *