विदर्भात दुष्काळ जाहीर करा! पावसाची तूट गंभीर; हेक्टरी 50 हजार मदतीची रोहित पवारांची मागणी

विदर्भासह राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केली. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सलील देशमुख उपस्थित होते.

शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्यातील विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भातील परिस्थितीही गंभीर असल्याचे ते म्हणाले. विदर्भातील अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत पावसाची कमतरता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतही ३० ते ६० टक्क्यांपर्यंत पावसाची तूट असल्याचे त्यांनी नमूद केले.

पावसाअभावी खरीप हंगाम अडचणीत आला असून, आगामी रब्बी हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विलंब न करता दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांसोबतच शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांनाही मदत द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

‘राजकीय खेळ’ पार्थ

पवारांना कळेल

पार्थ पवार आणि भाजप आमदार परिणय फुके यांच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. ‘पार्थ पवारांना आता भाजपचा राजकीय खेळ समजेल. मित्रपक्षातील नेत्यांनाही भाजप कसे अडचणीत आणते, हे पुढे स्पष्ट होईल,’ असा टोला त्यांनी लगावला. देवरी तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील कथित गैरव्यवहारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

२३ सप्टेंबरला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरही पवार यांनी संशय व्यक्त केला. एफडीए पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला का, हे स्पष्ट व्हावे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी पेपरफुटीच्या प्रकरणांची कठोर चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *