शहरातील वाढत्या चेन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मकोकासह पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या सराईत इराणी चेन चोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 27 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ज्याची किंमत 34 लाख 33 हजार रुपये, जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत चेन चोरीचे तब्बल 15 गुन्हे उघडकीस आले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील चेन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना निष्पन्न करण्याचे आदेश गुन्हे शाखेतील पथकांना दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.
पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं?
पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चेन चोरीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी तात्काळ भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढत त्यांची ओळख पटविण्याचे काम करण्यात आले.
निगडी पोलीस ठाणे गुन्ह्यातील चेन चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सुमारे 400 ते 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे मुंबईपर्यंत आरोपींचा माग काढण्यात आला. या गुन्ह्यातील फिदा इराणी आणि आदित्य मनलोर यांना निष्पन्न करण्यात आले.
त्यानंतर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिदा इराणी याच्याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 5 सप्टेंबर 2026 रोजी देहूरोड परिसरातून फिदा इराणी याला अटक केली. त्याच्यासोबत त्याचा साथीदार मुकेश नेटके यालाही अटक करण्यात आली.
