पळून जात प्रेमविवाह, पण अवघ्या चार दिवसात पतीचं क्रूर पाऊल, नवी मुंबईतील नवविवाहितेचा करुण अंत

प्रेमविवाहानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने नवविवाहित पत्नीला केलेल्या कथित जीवघेण्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील घणसोली परिसरात हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला. सायली लोखंडे असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी पती सागर कदम याला अटक केली आहे. सागरने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सायलीने उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

पळून जाऊन प्रेम विवाह

नवी मुंबईतील घणसोली येथे राहणाऱ्या सायली लोखंडे हिचे त्याच परिसरात राहणाऱ्या सागर कदम याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ५ जून रोजी सायली नेहमीप्रमाणे कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर ती सागरसोबत निघून गेल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. दोघांनी लग्न केल्याचेही समोर आले. मात्र, लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत सायली रुग्णालयात दाखल असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली.

पतीविरोधात पोलिसात गुन्हा

सायलीला झालेल्या गंभीर दुखापतींची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी सागर कदम याच्याविरोधात मारहाणीची तक्रार रबाळे पोलिसांकडे दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मात्र, सायलीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल दोन महिने ती मृत्यूशी झुंज देत होती.

प्रेमसंबंधातून लग्न, चारच दिवसात उद्ध्वस्त

अखेर उपचारादरम्यान सायलीचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी दाखल गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवून आरोपी सागर कदम याला अटक केली. प्रेमसंबंधातून सुरू झालेला संसार लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत उद्ध्वस्त झाला आणि त्यानंतर तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज देऊन सायलीचा अखेर मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *