समृद्धी महामार्गावरील अपघातात 21 वर्षांचा तेजस ब्रेन डेड, अनावर दुःखातही गायकवाडांचा मोठा निर्णय, मुंबईपर्यंत एअर ग्रीन कॉरिडोर

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तेजस गायकवाड या २१ वर्षीय तरुणाचा उपचारांदरम्यान मेंदू मृत झाला. तरुण मुलाची अवस्था पाहून दुःख अनावर झाले असतानाही गायकवाड कुटुंबीयांनी दातृत्वाचा परिचय देत त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

तेजसचे अवयव गरजू रुग्णांना कामी

‘मविप्र’च्या वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाने रोड आणि एअर ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून तेजसचे हृदय विमानाने मुंबईला, तर लिव्हर आणि किडनी पुण्याला पाठविली. नाशिकमध्ये त्वचा आणि नेत्रही काही तासांत यशस्वीरीत्या पोहोचविण्यात आले. तेजसचे अवयव गरजू रुग्णांच्या कामी येणार आहेत.

गायकवाड कुटुंबाचं समुपदेशन

आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय व मविप्र रुग्णालयात तेजसवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित केल्यानंतर अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरची रीतसर परवानगी घेतली. त्यानंतर गायकवाड कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

नाशिक ते मुंबई विमानतळ ‘ एअर ग्रीन कॉरिडोर ’

नाशिक विमानतळ ते मुंबई विमानतळ असा विशेष ‘एअर ग्रीन कॉरिडोर’ तयार करून तेजसचे हृदय मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात पोहोचविण्यात आले. एक किडनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात, तर लिव्हर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात पाठविण्यात आले. याशिवाय, दोन्ही नेत्र मविप्र रुग्णालयातील नेत्रपेढीस आणि त्वचा डॉ. नेहते रुग्णालयातील त्वचापेढीस दान करण्यात आली. एक किडनी नाशिकमध्येच मविप्र रुग्णालयात दान करून तिचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *