घोडबंदर रस्त्यावर अवजड कोंडी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसरेवा येथील खाडीपूल दुरुस्तीच्या कामांमुळे गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीला सामोरे जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर आता अवजड वाहनांच्या बेशिस्तीमुळे कोंडी वाढू लागली आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन न चालवणे, मागून येणाऱ्या वाहनांना मार्ग करून न देणे आणि वेगमर्यादा ओलांडणे असे प्रकार अवजड वाहनांच्या चालकांकडून घडत असल्याने सकाळ, दुपार, संध्याकाळ या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण असल्याचा दावा पोलीस करत असले तरी, प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसल्याचा येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचा अनुभव आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून भिवंडीतील गोदामे आणि गुजरातच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक होते. गुजरातच्या दिशेने जाणारी वाहने घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून फाऊंटन चौकातून उजवीकडे वळण घेऊन वसई मार्गे पुढे वाहतूक करतात. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचीही मीरारोडमार्गे फाऊंटन चौकातून वाहतूक सुरू असते. काही महिन्यांपूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील खाडी-पुल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामामुळे घोडबंदर, मीरारोड आणि वसई मार्गावरील वाहने फाऊंटन चौकात काही काळ रोखून धरण्यात येत होती. त्यामुळे या तिन्ही मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागत होत्या. या पुलाचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्यानंतर येथील वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे. मात्र, त्यानंतरही या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. अवजड वाहनांच्या चालकांची बेशिस्ती यामागील मुख्य कारण असल्याचे दिसून येत आहे.

अवजड वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवण्याचा नियम आहे. मात्र, घोडबंदर रस्त्यावर हा नियम अवजड वाहनांच्या चालकांकडून पायदळी तुडवण्यात येत आहे. अवजड वाहनांचा वेग अन्य वाहनांच्या तुलनेत कमी असतो.

त्यात रस्त्याच्या मधून वा उजवीकडून जाणाऱ्या अवजड वाहनामुळे मागून येणाऱ्या इतर वाहनांना संथगतीने पुढे सरकावे लागते. परिणामी घोडबंदर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. गायमुख येथील चढणीवर वेग फारच कमी असतो.

ठाणे शहरातील महामार्गावरून रात्री ११ ते ५ या वेळेत अवजड वाहने सोडण्यात येतात. दुपारी ११ ते ५ या वेळेत मात्र ही वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येते आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत ही वाहतूक पुन्हा बंद करण्यात येते, असा दावा वाहतूक पोलीस करत असले तरी प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी उलट चित्र दिसते.

सायंकाळी सहानंतरही या ठिकाणी कोणत्याही मार्गिकेवर अवजड वाहने दिसून येतात. अनेकदा उजव्या मार्गिकेवर सिग्नलवर ही वाहने ठाण मांडून असतात. त्यामुळे उजव्या मार्गिकेवरून गृहसंकुलांकडे वळसा घेणाऱ्या वाहनांची लांब राग लागत असल्याचे चित्र येथे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *