सिद्धनकेरी येथे अज्ञात कारणावरून पतीने पत्नी आणि मुलीचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित संजय नागप्पा कोरे (वय ३५, रा. सिद्धनकेरी, ता मंगळवेढा, जि. सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. सुरेखा संजय कोरे आणि श्रीवेणी संजय कोरे असे मृत मायलेकींचं नाव आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, संजय हा रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरी आला. त्यावेळी सुरेखा या मुलगी श्रीवेणीसह जेवण करत होत्या. संजयने तीक्ष्ण हत्याराने सुरेखाच्या डोक्यात घाव घालून तिचा खून केला. मुलगी श्रीवेणी हिचाही त्याने गळा दाबून खून केला. ग्रामस्थांना खून झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित संजयला अटक केली. त्याने कशासाठी या दोघांचा खून केला हे अद्याप समजलेले नाही. पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
