आपल्याच पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. गाजियाबादमधील पाटला शहरात ही धक्कायदाक घटना घडली आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे, मुलगा झाला नाही या रागातून महिलेने आपल्या तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
‘आरती या महिलेने तीन महिन्यांपुर्वी एका मुलीला जन्म दिला होता. मुलगा न झाल्याने तिची प्रचंड चिडचिच होत होती. तिला स्वत:चा राग येत होता’, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश तोमर यांनी दिली आहे.
‘रविवारी महिलेने उशीच्या सहाय्याने मुलीचं तोंड दाबून हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह वॉशिंग मशिनमध्ये लपवून ठेवला होता’, असं आकाश तोमर यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘सुरुवातीला महिलेने आपल्या मुलीचं अपहरण झाल्याचा दावा केला होता. पण कसून चौकशी केल्यानंतर आपणच आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली तिने दिली’.
