रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरल्याने ट्रेलरखाली आली
शहराच्या चहुबाजूला खड्डे असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत असताना पारडी परिसरात खड्डय़ांमुळेच दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीचा ट्रेलरखाली येऊन मृत्यू झाला. भारती अनिल वनारसे (१५) रा. चिखली असे मृत मुलीचे नाव आहे.
भारती ही पारडी परिसरातील राम मनोहर लोहिया शाळेत दहावीची विद्यार्थिनी आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी ती सायकलने शाळेत जाण्याकरिता निघाली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास रस्त्यावरून एक ट्रेलर मोठय़ा तारांचे रिंग घेऊन जात होता. त्याची गती संथ असली तरी तो रस्त्याच्या मधोमध धावत असल्याने मुलगी ट्रेलरच्या डाव्या बाजूने सायकल चालवत जात होती. दरम्यान, रस्त्यालगत खोदलेल्या खड्डय़ाच्या मातीच्या ढिगाऱ्यावरून भारतीची सायकल घसरल्याने ती रस्त्यावर पडली व ट्रेलरच्या चाकाखाली आली. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रेलरचालक (एमएच-४०, एन-२५४७) वाहन सोडून पळून गेला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. कळमन्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात एक पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांनी ट्रेलर जप्त केला. भारतीचे वडील भंगारचा व्यवसाय करतात. तिला एक मोठा भाऊ व एक लहान बहीण आहे. या परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. चार दिवसांपासून तेथे त्यासाठी खड्डे खोदून ठेवण्यात आले. माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे. मात्र, अद्यापही खड्डे बुजवण्यात आले नाही. अशी परिस्थिती सर्वत्र असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
ओसीडब्ल्यूवर गुन्हा दाखल होणार
जलवाहिनी टाकण्याचे काम ओसीडब्ल्यूकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे. या कंपनीविरुद्ध यापूर्वीच सदर, इमामवाडा आदी ठिकाणी विनापरवानगी खड्डे खोदण्याचे गुन्हे दाखल आहेत. आता एका खड्डय़ामुळे एका मुलीचा मृत्यू झाल्याने पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे. ट्रेलरचालकासह कंपनीच्या संचालकांविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. मात्र, या कंपनीवर राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याने कंपनीवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.
खड्डे खोदताना नियमांचे उल्लंघन
खड्डे खोदण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी मिळवताना पोलिसांकडून अनेक अटी घालण्यात येतात. मात्र, कंपनीकडून नियमांचे पालन केले जात नाही. नियमानुसार खड्डय़ाच्या सभोवताल बॅरिकेटिंग करावी लागते. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून स्वयंसेवक उभे करावे लागतात. त्या ठिकाणी रात्री अंधार पडत असेल, तर प्रकाश व्यवस्था करावी लागते. कामाच्या ठिकाणी कंत्राटदार व संबंधितांचे नाव व मोबाईल क्रमांकाचे फलक लावावे लागतात. काम पूर्ण झाल्यावर खड्डे व्यवस्थित बुजवावे लागतात. मात्र, कंपनीकडून सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येते.
लोकांच्या जीवाशी खेळ
एकेकाळी नागपुरातील गुळगुळीत रस्त्यांचे दाखले सर्वत्र देण्यात येत होते. मात्र, आता रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरांच्या चहुबाजूला मेट्रो, सिमेंट रस्ते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेचे खोदकाम व ओसीडब्ल्यू आदींमुळे सर्व रस्त्यांवर खड्डे असून शहर एकप्रकारे ‘खड्डेपूर’ झाले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने कंत्राटदारांचे सत्ताधाऱ्यांशी साटेलोटे असल्याने कंत्राटदारांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. डांबरीकरण करताना डांबर न वापरता काळ्या रंगाचे रसायन वापरले जाते. त्यामुळे रस्ते महिनाभरातच उखडतात. सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करताना गैरव्यवहार झाले आहेत. मात्र, सत्ताधारी निर्ढावल्यासारखे वागत असून नागरिकांच्या जीवाशी खेळण्यात येत आहे.
