लग्नाच्या वेळी जन्मभर एकमेकांची साथ देण्याच्या आणाभाका घेणारे अनेक जण आपण पाहिले असतील. मात्र हे वचन पाळणारे सापडणं तसं विरळाच. कधी मृत्यूने तरी कधी इतर कारणांनी दोघांची ताटातूट होते. अमेरिकेतील एका जोडप्याला काळाने विलग केलं असं म्हणणंही चुकीचे ठरेल. कारण 75 वर्षांच्या संसारानंतर या जोडप्याने एकत्र एकमेकांच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला.
जेनेट आणि अॅलेक्झॅंडर यांच्या 75 वर्षांच्या सुखी संसाराची कहाणी त्यांच्या मृत्यूनंतर एकत्रच संपली. दोघं जण एकमेकांना बालपणापासून ओळखत होते. वयाच्या 8 व्या वर्षी त्यांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि अखेर 1940 साली ते विवाहबंधनात अडकले. 75 वर्षांच्या काळात त्यांनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. मात्र कधी एकमेकांची साथ सोडण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही.
काही आठवड्यांपूर्वी अॅलेक्झॅंडर यांना गंभीर जखम झाली. वाढत्या वयामुळे या दुखण्यातून ते पूर्णपणे बरे होऊ शकले नाहीत. उलट त्यांचा आजार वाढतच गेला. आणि एके दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
जेनेट यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. अॅलेक्झॅँडर यांच्या मृत्यूनंतर त्याही अंथरुणाला खिळल्या. दुसऱ्याच दिवशी त्यांचंही निधन झालं. त्यांच्या पश्चात रिचर्ड आणि एमी ही दोन मुलं आहेत.
जेनेट आणि अॅलेक्झँडर यांच्या सच्च्या प्रेमाची ही सत्यघटना इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली जाईल, यात काही शंका नाही.

