अज्ञात ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवार) सकाळी सातच्या सुमारास मोहोळ-पंढरपूर मार्गावरील पोखरापूरनजीक घडली. या अपघातात प्रवीण सर्जेराव भोसले-पाटील (वय २५) आणि त्याची आई आविंदा सर्जेराव भोसले-पाटील (वय ४६, दोघेही रा. पापरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रवीण आणि आविंदा हे दोघे दुचाकीवरून नातेवाईकाच्या उत्तरकार्यासाठी पंढरपूरच्या दिशने जात होते. मोहोळ-पंढरपूर राज्य मार्गावर पोखरापूरजवळ सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात भोसले मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांना एका ट्रकचा बंपरचा तुकडा सापडला असून त्यावरून पोलिसांनी शोध सुरू केला आहे. सावळेश्वर टोल नाका येथील सीसीटीव्ही फुटेजवरून ट्रकचा फोटो पोलिसांनी मिळवला आहे. मोहोळ पोलिसांत गुन्हा नोंद करून घेण्याचे काम सुरू होते.
