फेसबुकवर मैत्री करून मुलींची फसवणूक आणि लग्नाचे आमीष दाखवून बलात्काराच्या घटना घडल्या असताना आता एका तरूणाला फेसबुकवर कॉमेंट पोस्ट केल्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. पुण्याजवळी म्हाळुंगे इथं ही घटना घडली. फेसबुक अकाउंटवर कमेंट पोस्ट केल्याच्या रागातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. गेल्या आठवड्यात बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास इथं ही घटना घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फेसबुकच्या वादातून गोपाळ श्रीमंत पवार या तरूणाला ही बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याने हिंजवडी पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली. गोपाळ पवारच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय पाडाळे, वैभव पाडाळे, गणेश भेगडे, गौरव पाडाळे आणि विकी शितोळे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
म्हाळुंगेत राहणाऱ्या संतोष कातुरे या मित्राला भेटण्यासाठी गोपाळ गेला होता. जेवण करून गोपाळ आणि संतोष घराबाहेर आले होते. त्यावेळी संजय पाडाळे हा चौघांसह तिथे दाखल झाला. ‘तुझे फेसबुक अकाउंट आहे’ अशी विचारणा संजयने गोपळला केली. आणि ‘तू फेसबुकवर कॉमेंट का टाकली’ असा जाब विचारत गोपाळला मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.