औषध आणि अन्न प्रशासन अर्थात एफडीएच्या ताज्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एफडीएने सहा शहरांमधील दुधाचे नमुने घेऊन सरप्राईज इन्स्पेक्शन केलं. या गुणवत्ता चाचणीत 16 नमुन्यांमध्ये दोष आढळले तर पाच नमुने असुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या चाचणीत एकूण 121 नमुने घेतले होते. मुंबईतील सर्वाधिक नमुने गुणवत्ता चाचणी नापास झाले किंवा असुरक्षित असल्याचं समोर आलं. यात मुंबईनंतर पुणे आणि साताऱ्याचा नंबर आहे.
तपासणीसाठी 16 पथकांची स्थापना
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगलीच्या डेअरी अँड मिल्क प्रोसेसिंग युनिटमध्ये 26 मे रोजी सरप्राईज इन्स्पेक्शन केलं होतं. एफडीएने दुधाच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी 16 पथकांची स्थापना केली होती.
एफडीएचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या माहितीनुसार, “मुंबईच्या विविध भागातून घेतलेले दुधाचे 10 नमुने खराब निघाले. यापैकी 7 नमुन्यांमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक होतं तर तीन नमुन्यांमध्ये स्टार्च आढळलं. हे तिन्ही नमुने पिण्यासाठी असुरक्षित आहेत. पुण्यात 50 नमुने घेतले, ज्यात चार गुणवत्ता चाचणीत फेल झाले तर दोन नमुने असुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं.”
“आम्ही या प्रकरणी 39 गुन्हेगारी खटले दाखल केले आहेत. तसंच 148 प्रकरणात 25.78 लाख रुपयांचा दंड आकारला आहे,” असंही हर्षदीप कांबळे यांनी सांगितलं.

