महागडी, अलिशान, सॉलिड लूक असणारी कार आपल्यापाशी असावी अशी आजच्या प्रत्येक तरुणाची जवळपास इच्छा असते. मात्र याच लालसेपायी साताऱ्याच्या बावीस वर्षीय प्रतिक भोसलेने टेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली चक्क लाखोंची मर्सडीज बेन्ज लंपास केली आहे.
मुळचा फलटण तालुक्यातील वडगांव धायरी गावच्या प्रतिक भोसलेने गेल्या काही वर्षात टेस्ट ड्राइव्हसाठी गाडी घेवून जाताना ती तशीच लंपास केल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. ३ जुलै रोजी प्रतिक भोसले हा वाशीतील मर्सडीज बेन्ज शोरूम मध्ये गाडी विकत घेण्याच्या बहाण्याने गेला.
त्या गाड्यांबद्दल आपणास बरीचशी माहिती असल्याचे दाखविल्याने शोरूममधील मँनेजरनेही त्याला ३४ लाख ५० हजाराची मर्सडीज बेन्ज माँडेल नंबर- सीएलए २०० सीडीआय स्पोटर्स कार दिली होती. त्याच्याबरोबर शोरूममधील सेल्स प्रतिनिधी श्वेता राऊत ही टेस्ट ड्राइव्ह करताना गाडीत बसून गेली होती.
नेरूळ येथील एका हॉटेलबाहेर गाडी थांबवित आपणास ही गाडी पसंत असून याबाबतची कागदपत्रे आपल्या भावाच्या हॉटेलमध्ये बसून करू अशी बतावणी त्याने केली. त्याच वेळेस श्वेता राऊत हिला आपण फ्रेश होतो. असे सांगत प्रतिकने हॉटेलमधून काढता पाय घेत गाडी लंपास केली आणि थेट आपलं गाव गाठलं. गावाकडे गेल्यानंतर पट्याने आपण नवीन गाडी आणल्याचे गावकऱ्यांना भासवत त्या गाडीची पूजा करून पेढेही वाटले.
वाशीतील मर्सडीज बेन्ज शोरूममधून गाडी चोरीला गेल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. प्रतिक भोसले यांने शोरूमध्ये गेल्यानंतर आपले नाव हे म्हात्रे असल्याचे सांगितले होते. नवी मुंबई पोलिसांनी अशा प्रकारे गाड्या चोरून नेण्याचा प्रकार याआधी राज्यात कुठे झाला आहे का याची माहिती घेतली असता पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात अशी तक्रार याआधी दाखल असल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याठिकाणी जात सदर आरोपीचा फोटो आणून श्वेता राऊत हिला दाखविला असता तो प्रतिक भोसले असल्याचे तिने ओळखले. यानंतर पोलिसांनी आरोपी प्रतिकच्या गावी जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.

