स्वतःच्या जीवावर उदार होत आजोबांनी आपल्या दीड वर्षांच्या नातीला मरणाच्या दारातून सुखरुप वाचवलं आहे. ऑस्ट्रेलियामधल्या सिडनी शहरातील वेंटवर्थविल स्टेशनवर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
भारतीय वंशाचे हे ‘सुपरहिरो’ आजोबा काहीच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते. कुटुंबियांसोबत गुरुद्वाराला जाण्यासाठी ते वेंटवर्थविल स्टेशनवर ट्रेनची वाट बघच उभे होते. मात्र प्लॅटफॉर्मवरील उतारामुळे चिमुरडीची बाबागाडी घसरत रुळांवर पडली. आजोबांच्या हे लक्षात येताच ते नातीला वाचवण्यासाठी धावले, तोच त्याच रुळावरुन वेगाने रेल्वे येत असल्याचंही त्यांच्या ध्यानात आलं.
मात्र कुठलाही वेळ न दवडता जीवावर उदार होऊन आजोबांनी रेल्वे रुळावर उडी मारली. त्यानंतर नातीला त्यांनी तिच्या आईकडे सोपवलं, तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रुळाच्या दुसऱ्या बाजूला उडी घेतली.
त्यानंतर काही क्षणांमध्येच रेल्वे जोरदार वेगाने पुढे निघून गेली. आजोबांनी एखाद्या सेकंदाचाही विलंब केला असता तर तो त्यांच्या किंवा नातीच्या जीवावर बेतू शकला असता.

