गर्भवती महिला ही दोन जीवांना सांभाळत असते. त्यामुळे तिचे योग्य पद्धतीने पोषण होणे अतिशय आवश्यक असते. पोषण चांगले होण्यासाठी आहाराची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. महिला गर्भवती आहे हे कळल्यापासून तिला घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून अनेक सूचना दिल्या जातात. याशिवाय सध्या इंटरनेटवरही मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असल्याने त्याचा आधार घेत महिला आपल्या आहाराचे नियोजन करते. पण फ्लोरिडा विद्यापीठात नुकताच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, गर्भारपणात मासे खाल्ल्यास होणाऱ्या बाळाला अस्थमा होण्याचा धोका कमी असतो.
माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. गर्भवती महिलेने शेवटच्या तीन महिन्यांमध्ये मासे खाल्ल्यास होणाऱ्या बाळाला श्वसनाचे त्रास उद्भवत नाहीत. त्यामुळे गर्भवती महिलांना आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा ठराविक मासे खायला हवेत. संशोधकांनी यासाठी ३४६ महिलांचा अभ्यास केला. त्यांना गर्भारपणाच्या शेवटच्या ३ महिन्यांच्या कालावधीत मासे खायला दिले. त्यानंतर त्यांच्या बाळाच्या प्रकृतीची तपासणी केली असता या बाळांना श्वसनाशी निगडीत त्रास कमी होत असल्याचा निष्कर्ष निघाला.
ओमेगा ३ फॅटी अॅसिडची सहजासहजी निर्मिती करता येत नाही, तर सी फूडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. केवळ श्वसनासाठीच नाही तर एकूणच गर्भाच्या उत्तम वाढीसाठीही हे मासे अतिशय उपयुक्त असतात.