वकिलाच्या खात्यातून ८ मिनिटांत १ लाख गायब

बँक, पोलिसांनी जबाबदारी झटकल्याचा आरोप

उच्च न्यायालयात वकिली करणारे अ‍ॅड. विक्रांत बनसोडे यांनी न्यू इंडिया को-ऑप. बँकेच्या बचत खात्यात ठेवलेले १ लाख रुपये मध्यरात्री अचानक बेपत्ता झाले. बोरिवलीच्या एक्सर भागातील एटीएम केंद्रातून अवघ्या आठ मिनिटांमध्ये सलग १० व्यवहार करून अज्ञात व्यक्तीने ही रक्कम काढून पोबारा केला. ही व्यक्ती पैसे काढत होती तेव्हा अ‍ॅड. बनसोडे नवी मुंबईतील आपल्या निवासस्थानी होते आणि त्यांचे डेबिट कार्डही त्यांच्यासोबतच होते. पोलीस व संबंधित बँक जबाबदारी झटकत असल्याने महिना लोटला तरी पैसे कोणी व कसे काढले याबाबतचा तपास सुरू झालेला नाही.

न्यू इंडिया बँकेच्या सांताक्रूझ शाखेत बनसोडे यांचे बचत खाते आहे. १९ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास मोबाइलवर धडाधड येऊन पडलेल्या दहा लघुसंदेशांमुळे ते झोपेतून उठले. इतके लघुसंदेश एकाच वेळी आल्याने त्यांनी लागलीच मोबाइल तपासला. ते लघुसंदेश बँकेचे होते. १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५६ मिनिटे ते १२ वाजेपर्यंत एटीएम केंद्रातून पाच व्यवहार केले गेले. प्रत्येक व्यवहारात १० हजार रुपये काढले गेले. १२ वाजल्यानंतर म्हणजेच १९ सप्टेंबर सुरू होताच रात्री १२ ते १२.०५ या वेळेत अशाच पद्धतीने आणखी ५० हजार रुपये काढण्यात आले, अशी माहिती न्यू इंडिया बँकेने १० लघुसंदेश धाडून कळवली होती. ती वाचून अ‍ॅड. बनसोडेंना धक्का बसला. त्यांचे डेबिट कार्ड पाकिटातच होते. दुसऱ्याच क्षणाला बनावट कार्डाद्वारे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आधीचे कार्ड जुने झाल्याने त्यांना अलीकडेच बँकेने नवे कार्ड दिले होते. योगायोग हा की ही घटना घडली त्याच्या दोनच दिवसांआधी मोठी रक्कम बनसोडे यांनी बँक खात्यात जमा केली होती. त्यामुळे या प्रकारामागे बँकेतल्याच कोणाचा तरी हात असावा, असा संशय ते व्यक्त करतात. मी हॉटेल किंवा अन्य खरेदीचे पैसे कार्डाद्वारे भरलेले आहेत. एटीएममधूनही पैसे काढलेले आहेत. त्यामुळे कुठे तरी मूळ कार्डाचे तपशील चोरून, चार अंकी पिन नंबर मिळवून बनावट कार्ड तयार (क्लोनिंग) ही चोरी करणे शक्य आहे. परंतु एकाच वेळी एवढी रक्कम अचानक गायब होणे, हाही योगायोग नाही, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. बनसोडे यांनी व्यक्त केली.

पोलीस, बँकेकडून सहकार्य नाही

१९ सप्टेंबरला बनसोडे यांनी एमएचबी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली, तसेच न्यू इंडिया बँकेला अंतर्गत चौकशी करून अहवाल द्यावा, अशी विनंती केली. ही रक्कम एक्सर परिसरातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम केंद्रातून काढण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. याप्रकरणी बँका सीसीटीव्ही चित्रण देत नाहीत, तपासाला सहकार्य करत नाहीत, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यानंतर बँकेकडून तक्रार आल्यास आम्ही तपास करू, असेही सांगण्यात आले. बँकेनेही १५ दिवसांत चौकशी करून सांगू, कळवू अशी टाळाटाळ सुरू केली. याबाबत न्यू इंडिया बँकेच्या व्यवस्थापक वीणा फर्नाडिस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय बँक आणि ग्राहकापुरता मर्यादित आहे. तपशील देता येणार नाही असे सांगितले. अशा प्रकरणांमध्ये बँकेची काय भूमिका असते, प्रक्रिया कशी असते, असे विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *