ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे निधन

सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्या ८८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारांदरम्यान तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

गिरिजा देवी या बनारस घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी ‘ठुमरी’ या गाण्याच्या प्रकारात त्या पारंगत होत्या. आपल्या याच गुणवैशिष्ट्यामुळे त्या ‘ठुमरीची राणी’ म्हणून प्रसिद्ध होत्या. गिरिजा देवी यांना १९७२ मध्ये पद्मश्री किताबाने त्यानंतर १९८९ मध्ये पद्मभूषणने तर २०१६ मध्ये पद्मविभूषण किताबाने गौरवण्यात आले होते.

गिरिजा देवी यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एका युगाचा अंत झाला असला तरी त्यांची गायिकी कायमच जिवंत राहिल. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीतातील तारा निखळल्याच्या प्रतिक्रिया या क्षेत्रातील जाणकारांनी दिल्या आहेत. पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात त्यांनी अनेकदा आपल्या गायकीने पुणेकरांसह मराठी रसिकांना शास्त्रीय गायकीची भेट दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *