संगमेश्वरजवळ मिनी बसची एसटीला धडक, १२ प्रवासी जखमी

संगमेश्वरजवळ मिनी बसने एसटी बसला धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या अपघातात १२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील २ ते ३ प्रवाशांची प्रकृती गंभीर असून उर्वरित प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.

रत्नागिरी- चिपळूण या मार्गावर अनेक खासगी बसेसही धावतात. संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझरखोल येथे मिनी बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटीला धडक दिली. या अपघानानंतर मागून येणारी कार एसटी बसवर आदळली.

जखमींमध्ये मिनी बसमधील प्रवासी जास्त असल्याचे समजते. मिनी बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते, या अपघातामुळे मिनी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात झाला त्या रस्त्यावर वळण असून यामुळे मिनी बस चालकाचा अंदाज चुकला आणि हा अपघात झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. अपघातामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *