चार जणांचा जीव घेणाऱ्या बोर अभयारण्यातील नरभक्षक वाघिणीचा शनिवारी मृत्यू झाला. सिंदीविहरी येथील शेतात विजेच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाला असून याबाबत वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या वाघिणीला दिसता क्षणी गोळ्या घालण्याच्या आदेशाला हिरवा कंदील दाखवला होता.
ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून बोर अभयारण्यात सोडलेल्या वाघिणीची जंगलाशेजारील गावांमध्ये जीवघेणी दहशत पसरली होती. या वाघिणीने चार बळी घेतल्याने बोर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली. वाघिणीच्या वर्धा जिल्ह्यातील मुक्कामास ७५ दिवस लोटूनही तिच्यावर नियंत्रण ठेवण्यावर किंवा तिला जाळ्यात ओढण्यास वनखात्यास अपयश येत होते. वाघिणीला गोळ्या घालून ठार मारल्याशिवाय नियंत्रणात आणणे शक्य नाही, अशी वनाधिकाऱ्यांची भूमिका होती. शेवटी मुख्य वनसंरक्षकांनी या नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात काही प्राणीमित्रांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
मध्य प्रदेशमध्ये वाघांच्या सुटकेबाबतचे प्रयोग यशस्वी होत असताना, महाराष्ट्रात त्यांना मारण्याची वेळ का यावी? वनखात्याचे अपयश लपवण्यासाठी वाघाला ‘नरभक्षक’ ठरवून त्यांना बदनाम तर केले जात नाही ना? असे प्रश्न उपस्थित होत होता.
गुरुवारी हायकोर्टाने वनाधिकाऱ्यांच्या आदेशाला हिरवा कंदील दाखवला होता. यानंतर प्राणीमित्रांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी नरभक्षक वाघिण वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहरी येथील शेतात पोहोचली. शेतातील विजेच्या तारांना स्पर्श केल्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र वाघिणीचा मृत्यू कशामुळे झाला याविषयी वनखात्याने स्पष्टीकरण दिलेले नाही.
