विमानाच्या तिकीटांमध्ये लवकरच १५ टक्क्यांची वाढ?

विमानाच्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्याचा विचार विमान कंपन्यांकडून सुरु आहे. त्यामुळे लवकरच विमानाच्या तिकीट दरांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने विमान कंपन्यांकडून तिकीट दरांमध्ये वाढ केली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) अनेकदा वाढ झाली आहे. रविवारीही इंधन विपणन कंपन्यांनी एटीएफमध्ये ६ टक्क्यांची वाढ केली. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने इंधनाचे दर वाढले आहेत.

नव्या दरवाढीमुळे दिल्लीत एटीएफ ३,०२५ रुपये प्रति किलोलीटरने महागले आहे. एटीएफचे दर ५०,०२० प्रति किलोलीटर रुपयांवरुन ५३,०४५ रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये एटीएफच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मागील महिन्यात एटीएफच्या दरांमध्ये ४ टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे लवकरच विमान कंपन्यांकडून तिकिटांच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. याबद्दल विमान कंपन्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र एटीएफच्या दरांमध्ये होत असलेली वाढ आणि रुपयाच्या मूल्यात होत असलेली घसरण याचा फटका विमान कंपन्यांना बसतो आहे.

दरवाढीच्या फटक्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी विमान कंपन्यांकडे अतिशय कमी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना तिकिटांचे दर वाढवावे लागतील. अन्यथा विमान कंपन्यांना किंगफिशर एअरलाईन्ससारख्या समस्यांचा सामना करावा लागेल. ‘आम्हाला तिकीट दराबद्दल लवकरच निर्णय घ्यावा लागेल. विमान सेवा चालवण्याच्या खर्चात मोठी वाढ झाली असून, हा खर्च आता ग्राहकांकडूनच वसूल करावा लागेल,’ अशी माहिती एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली.

एटीएफचे वाढलेले दर, घसरलेला रुपया यामुळे विमान कंपन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच १ ऑगस्टपासून सरकारकडून प्रत्येक फ्लाईटमागे ५ हजार रुपये रिजनल कनेक्टिव्हिटी सेस आकारला जात आहे. बहुतांश विमान कंपन्यांनी या अतिरिक्त खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकला आहे. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घट झाल्याने काही महिन्यांपूर्वी विमान कंपन्या ग्राहकांना स्वस्तात प्रवास करण्याच्या ऑफर्स देत होत्या. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *