मृत्यूच्या दारातून परतलो..

सकाळची वेळ असल्याने एल्फिन्स्टन-परळ स्थानकाला जोडणाऱ्या पुलावरील गर्दी वाढत चालली होती. एल्फिन्स्टनच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्यांपर्यंत आम्ही कसेबसे पोहोचलो. मात्र त्यानंतर मागच्या बाजूने प्रचंड गर्दीचा लोंढा आमच्या अंगावर आला आणि आम्ही खाली कोसळलो. मी गुडघ्यांचा आधार घेत खाली कोसळले. त्यानंतर काही कळायच्या आत माझ्या मागे उभे असलेले प्रवासी माझ्या अंगावर आले. पुलाच्या एका बाजूला असल्याने शेजारील खांब मी गच्च पकडला होता. त्याचा आधार घेत मी उठण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र माझ्या अंगावरील वजनाने मला सावरता येत नव्हते. वाढत्या वजनामुळे मला श्वासही घेता येत नव्हता. पुढची १० मिनिटे मी उठण्याचा प्रयत्न करत होती. मात्र साधे हलणेशी शक्य नव्हते. माझा जीव गुदमरतोय, मला यातून बाहेर काढा ही ओरडही कोणापर्यंत पोहोचत नव्हती. सर्व जण स्वत:चा बचाव करण्यासाठी धावाधाव करीत होते. आता बाहेर पडणे शक्य नसल्याने मी जगण्याची आशाच सोडून दिली होती, असे सांगत असताना अपर्णा सावंत हिच्या डोळ्यात पाणी तरळले होते.

शुक्रवारी एल्फिन्स्टन व परळ स्थानकाला जोडणाऱ्या पुलावरील चेंगराचेंगरीत जखमी झालेले प्रवाशी केईएम रुग्णालयात उपचार घेत आहे. रविवारी सुट्टी असतानाही केईएम रुग्णालयात जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांची गर्दी होती. या जखमी प्रवाशांपैकी अपर्णा सावंत (३०) यांच्या कमरेला व पायाला जबर दुखापत झाली आहे. तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो, असे त्या सांगत होत्या. चेंगराचेंगरीत जमिनीवर कोसळल्यानंतर अनेक जण माझ्या अंगावरून जात होते. माझ्या पाठीवर, कमरेवर पाय देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न प्रवासी करीत होते. एकेकाच्या वजनामुळे जीव जातो की काय अशी अवस्था झाली होती. नवरात्रीचे उपवास सुरू असल्याने आधीच अशक्तपणा आला होता. आजूबाजूला आरडाओरडा सुरू होता. महिलांच्या रडण्याचे, किंकाळ्यांचे आवाज येत होते. डोळ्यांसमोर अंधारी आली होती, असे अपर्णा सांगत होती. डोळे उघडले तेव्हा अपर्णा केईएम रुग्णालयात खाटेवर होती. अपर्णा गेल्या दीड वर्षांपासून गर्भधारणेसाठी उपचार करीत आहे. या दुर्घटनेचा गर्भधारणेवर काही गंभीर परिणाम होईल की काय अशी भीती तिला वाटत आहे. अपर्णासारख्याच शरयू गावडे, प्रज्ञा बागवे, श्रद्धा नायगावकर अशा अनेक महिला या चेंगराचेंगरीत अडकल्या होत्या. सध्या सर्व जखमी प्रवासी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दुर्घटनेत मृत्यूंच्या दारातून परत आलो अशी भावना या महिलांनी व्यक्त केली.

मूळ गुजरातचा मात्र गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत रोजगारासाठी आलेला पीयूश ठक्कर (२७) हा तरुणदेखील या चेंगराचेंगरीत सापडला होता. पुलावरून आलेल्या माणसांच्या गर्दीत तो लोटला गेला. मात्र त्यातच त्याने पायऱ्यांजवळील खांब गच्च दोन्ही हातांनी पकडून धरला. त्याच्या शरीराखाली तीन प्रवासी व शरीरावर चार प्रवासी असल्याने पीयूश याला हालचाल करता येत नव्हती. श्वास घेता यावा यासाठी त्याने पुलाच्या बाहेरील बाजूने चेहरा बाहेर काढला. मात्र पोटावर व पाठीवर दाब येत असल्याने त्याला श्वास घेता येत नव्हता. शेवटी त्याने तोंडाने श्वास घेण्यास सुरुवात केली. तोंडही कोरडे होत होते. मात्र जीव वाचावा यासाठी तो प्रयत्न करीत होता. तोपर्यंत पुलाच्या बाहेरील बाजूने काही माणसे मदतीसाठी धावत आली. त्यांनी पीयूशचा हात पकडून त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. मी पण प्रयत्न करीत होतो, पण काहीच साध्य होत नव्हते. फक्त श्वास जाणेच बाकी होते, असे पीयूश सांगत होता. सर्वसामान्यांच्या मृत्यूशिवाय कुठलीच सुधारणा होत नाही. आता राजकीय मंडळी मेणबत्त्या लावून मृतांना श्रद्धांजली देत आहेत, मात्र तातडीने मोठा पूल तयार करणे हीच मृतांसाठी श्रद्धांजली असेल, असे पीयूश म्हणाला.

एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेत जखमी झालेल्या १२ प्रवाशांना रविवारी उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. यात १० पुरुष व दोन महिलांचा समावेश होता. शनिवारी दोन रुग्णांना घरी पाठविण्यात आले होते, तर एका जखमी प्रवाशाचा मृत्यू झाला होता. सध्या २० जखमी प्रवासी केईएममध्ये उपचार घेत आहेत.

एल्फिन्स्टन रोड व परळ स्थानकाला जोडणाऱ्या पुलावरील चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या प्रवाशांना केईएम रुग्णालयात उपचार दिले जात आहे. या जखमींवर मोफत उपचार केले जातील असे राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र तरीही जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील औषधांच्या दुकानातून औषधे आणण्यास सांगितले जात आहे. सरकारने मोफत उपचार देण्याचे सांगितल्यानंतरही आम्हाला औषध आणण्यास सांगण्याचे कारण काय, असा प्रश्न आठ क्रमांकांच्या वॉर्डमध्ये दाखल झालेल्या जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांनी केला आहे.

 जखमींना दिली होती ५०० रुपयांची मदत

शुक्रवारी एल्फिन्स्टनवरील चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या प्रवाशांना सुरुवातीला ५०० रुपयांची मदत देऊ केली होती. यावर जखमींच्या नातेवाईकांनी विरोध व्यक्त केला. आम्हाला पैशांची आवश्यकता नाही, अशी भावना जखमींनी व्यक्त केली. जखमी प्रवाशांच्या विरोधानंतर ही रक्कम वाढवून ५० हजार रुपयांपर्यंत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *