शाळेत खेळताना पहिलीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू…

शाळेत खेळताना अचानक बेशुद्ध पडून पहिलीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना पवार पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी सकाळी घडली. यासंदर्भात साकीनाका पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

स्वरांग रत्नदीप दळवी (६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मधल्या सुट्टीत तो वर्गाबाहेर गेला व १०च्या सुमारास बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला शाळेतील प्रथमोपचार विभागात नेले. नंतर तातडीने हिरानंदानी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती मुख्याध्यापिका मधुरा फडके यांनी दिली.

स्वरांगचे वडील रत्नदीप हे पवार पब्लिक शाळेच्या भांडुप शाखेत कला प्रशिक्षक आहेत. स्वरांग त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

बिस्कीट खाल्ल्यावर स्वरांगने मित्रांसोबत धावत होता. काही खाल्ल्यानंतर शरीराची लगेच झालेली हालचाल अन्ननलिकेतील ब्लॉकेजला कारणीभूत ठरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या पोटातील काही अंश व विसेरा कलिना प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून ते रिपोर्ट्स हाती आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

स्वरांग मित्रांसह धावता धावता थांबला. भिंतीला पकडून उभा राहिला व खाली कोसळल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. याशिवाय  सीसीटीव्ही फुटेजमध्ये सध्यातरी काही संशयास्पद आढळलेले नाही. सहा जणांचे जबाब नोंदवले असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

स्वरांग आजारी होता, त्याला मध्येच चक्कर यायची अशी चर्चा शाळेत होती. परंतु, तो आजारी नव्हता. त्याला हलका खोकला होता. मात्र कोणताही मोठा आजार नसल्याचे, त्याचे काका नीलेश दळवी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *