कल्याणमध्ये चोरट्याचा पोलीस चौकीतच आत्महत्येचा प्रयत्न

मोबाइल चोरटा असल्याच्या संशयावरून अटक करून पोलीस चौकीत आणले असता, चोरट्याने खिडकीवर डोके आपटून काच फोडली, तसेच आत्महत्येचाही प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षकाच्या मानेवर काचेने हल्ला करून, जखमी केल्याचा प्रकार शनिवारी रात्री बाजारपेठ पोलीस ठाण्यात घडला. संशयित चोरट्याचे नाव लतीफ जमील शेख (३२) असून, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
या परिसरात मोबाइल चोरटा येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. पोलिसांनी त्याप्रमाणे सापळा रचला. रात्री ९च्या सुमारास वल्लीपीर चौकातील नॉर्थ इंडिया बेकरीजवळ लतीफ शेख हा संशयास्पदरीत्या फिरत असल्याने, पोलिसांनी त्याला पकडून चौकीत आणले.
चौकशी सुरू करताच, त्याने खिडकीच्या काचेवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने फोडलेली काच पवार यांच्याच मानेवर मारून, त्यांना जखमी केले. स्वत:च्याही मानेवर काचेने मारून स्वत:ला जखमी करून घेतले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *