‘हिरो ऑफ वॉर’ अर्जन सिंह यांना अखेरचा निरोप

भारतीय हवाईदलाचे (आयएएफ) मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. दिल्लीतील बरार स्क्वेअरमध्ये अर्जन सिंह यांना शोकाकुल वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जन सिंह यांच्या सन्मानार्थ सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.

अर्जन सिंह यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. यावेळी अर्जन सिंह यांच्या सन्मानार्थ बंदुकांची सलामी देण्यात आली. याशिवाय फ्लाय पास्टदेखील करण्यात आला. यावेळी तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. १९६५ च्या युद्धावेळी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अर्जन सिंह यांना निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले.

फील्ड मार्शलचा दर्जा मिळालेले अर्जन सिंह हे हवाई दलाचे एकमेव अधिकारी होते. वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी वायूसेवेचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांचा जन्म १९१९ मध्ये पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात जन्म झाला होता. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. १९६५ च्या भारत पाक युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

त्यांच्या ९७ व्या वाढदिवसादिवशी म्हणजे २०१६ मध्ये पश्चिम बंगालमधील पानागड येथील हवाई दलाच्या एअर बेसला त्यांचे नाव देण्यात आले होते. हवाई दलाचे पानागड विमानतळ आता अर्जन सिंह यांच्या नावाने ओळखले जाते. एका हवाई दलाचे प्रमुखाचे नाव त्याच्या जिवंतपणी एका विमानतळाला दिले जाते, अशी घटना देशाच्या इतिहासात केवळ एकदा घडली आहे. अर्जन सिंह यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रूग्णालयात धाव घेतली होती.

आपल्या गौरवशाली कारकीर्दीत अर्जन सिंह यांनी ६० विविध प्रकारची विमाने उडवली होती. १९६९ मध्ये सेवानिवृत्त होतानाही त्यांनी विमानाचे उड्डाण करून आपल्यातील उत्साह कमी झाला नसल्याचे दाखवून दिले होते. ते जेव्हा एअर स्टाफचे प्रमुख होते त्या वेळी आयएएफमध्ये सुपरसॉनिक फायटर्स, टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि असॉल्ट हेलिकॉप्टर्सचा समावेश करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *