तीन वर्षांच्या चिमुरड्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण…

गुडगावमधील रायन इंटरनॅशनल शाळेतील प्रद्युम्न ठाकूर हत्या, बंगळूर येथे चार वर्षांच्या मुलीवर शाळेतील सुरक्षा रक्षकाने केलेला बलात्कार या सर्व घटना ताज्या असतानाच शिक्षण संस्थेबद्दल असुरक्षितता वाढवणारी अजून एक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका शिक्षिकेने प्ले ग्रुपमधील एका तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केली. देव कश्यप असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री पिल्ले असे या शिक्षिकेचे नाव असून बाल संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे या शिक्षिकेने देव कश्यप या तीन वर्षांच्या विद्यार्थ्याला लाकडी पट्टीने मारहाण केली. यात हा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. शिक्षिकेविरुद्ध तक्रार करण्यासाठी मुलाची आई लक्ष्मी कश्यप आणि वडील सांगवी पोलिसांत गेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मात्र सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. शिक्षिकेनं लाकडी पट्टीने देवच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर जबर मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. शिक्षिकेने केलेली मारहाण इतकी गंभीर होती की तीन दिवसांपासून मुलाच्या अंगावरील सूज उतरलेली नाही. त्यामुळे पालक चिंतातूर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *