गेल्या दोन दिवसांपासून शाळेत मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच हैरदाबादमधल्या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेचा गणवेश न घातल्याने एका ११ वर्षांच्या विद्यार्थीनीला मुलांच्या स्वच्छतागृहात उभं राहण्याची शिक्षा देण्यात आली.
‘मी वर्गात शिरत असताना शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षिकेने मला थांबवले. ‘तू गणवेश का घातला नाही?’ असा प्रश्न त्यांनी मला विचारला. आईने गणवेश धुवायला टाकला होता त्यामुळे मी गणवेश घालून आले नाही, असं खरं उत्तर मी दिलं. वर्गशिक्षिकेला माझ्या आईने एक चिठ्ठीदेखील लिहिली होती. मला गणवेशाशिवाय वर्गात बसण्याची परवानगी द्यावी अशी विनंती आईने वर्गशिक्षिकेला लिहिलेल्या चिठ्ठीत केली होती. पण शिक्षकांनी माझं न ऐकताच मला खेचत मुलांच्या स्वच्छातागृहात नेलं आणि तिथे उभं राहण्याची शिक्षा मला दिली.’ अशी प्रतिक्रिया पीडितेने दिली.
मला मुलांच्या स्वच्छातागृहात उभं राहिलेलं पाहून इतर विद्यार्थी माझ्यावर हसत होते. माझी टेर उडवत होते. बऱ्याच वेळानंतर मला पुन्हा वर्गात बसण्याची अनुमती शिक्षकांनी दिली, असंही तिने म्हटलं आहे. आता ही विद्यार्थीनी शाळेत जायला तयार नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर बालहक्क कार्यकर्त्यांनी शाळेच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो)अंतर्गत तक्रार नोंदवण्याची मागणी केलीय.
