हाडांच्या कर्करोगाचे प्रमाण १५ ते २९ या वयोगटामध्ये ६० टक्क्य़ांपर्यंत पोहोचले असून या वयोगटातील रुग्णांसाठी विशेष उपचार पद्धतीची आवश्यकता असल्याचे मत टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. परदेशात या वयोगटातील कर्करुग्णांसाठी स्वतंत्र उपचार पद्धती आहे. त्यात टाटा रुग्णालयातही या वयोगटासाठी स्वतंत्र उपचार पद्धती सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
२ व ३ सप्टेंबर २०१७ रोजी टाटा मेमोरिअल रुग्णालयातर्फे किशोरवयीन आणि तरुणांमधील कर्करोग या विषयावर सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात किशोरवयीन आणि तरुण रुग्ण त्यांचे कुटुंबीय, कर्करोगमुक्त रुग्ण व समाजातील तरुणांच्या मनातील सध्याच्या उपचारपद्धतीबद्दल व उपचारांच्या पर्यायाबद्दल असणारी शंका व भीती याबद्दल चर्चा झाली. लवकरच टाटा रुग्णालयात या वयोगटातील रुग्णांसाठी विशेष उपचार पद्धती सुरू करण्यात येणार असून यामध्ये रुग्णांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष दिले जाईल. सध्या कर्करुग्णांवर दिली जाणारी उपचार पद्धती पुरेशी नाही. केवळ केमोथेरेपी, रेडिएशन देऊन कर्करोग बरा होत नाही. यासाठी सातत्याने औषधांचे डोस घेणेही आवश्यक असते, असे रुग्णालयाचे डॉ. श्रीपाद बनावली म्हणाले.
सामाजिक व मानसिक मदतीची गरज
