बंगळुरूमध्ये मंगळवारी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या होऊन दोन दिवसही झाले नाहीत तोपर्यंत बिहारमध्ये एका वृत्तपत्राच्या पत्रकारावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. अरवल येथील राष्ट्रीय सहारा वृत्तपत्रात काम करणारे स्थानिक पत्रकार पंकज मिश्रा यांना दुचाकीवर आलेल्या दोघांनी जवळून गोळीबार केला. मिश्रा यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिश्रा यांच्या गावातीलच दोन लोकांना त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती अरवलचे पोलीस अधीक्षक दिलीप कुमार यांनी दिली. मिश्रा हे बँकेतून एक लाख रूपयाची रोकड घेऊन निघाले होते. दुचाकीवरून आलेल्यांनी मिश्रा यांना लुटले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या मते हा हल्ला वैयक्तिक द्वेषातून झाला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, बंगळूरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी हत्या करण्यात आली होती. कन्नड पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या गौरी यांच्यावर त्यांच्या राजराजेश्वरी नगर येथील घराजवळ गोळीबार करण्यात आला होता. लंकेश यांच्यावर ७ गोळ्या झाडल्या होत्या. त्यांच्या शरीरावर तीन गोळ्यांचे निशाण आढळून आले. पोलीस तपास करत आहेत.
