उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील बाबा राघवदास (बीआरडी) वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बालमृत्यू प्रकरणी शनिवारी पोलिसांनी डॉ. काफील खान यांना अटक केली. पोलिसांच्या विशेष कृती दलाकडून (एसटीएफ) त्यांना सकाळी ताब्यात घेण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच रुग्णालयाच्या प्राचार्यांसह इतर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यास सुरूवात केली होती.
बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाकडे लाखो रुपयांचे बील थकल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठा थांबवला होता. त्यामुळे रूग्णालयात उपचार घेण्याऱ्या ७० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ३५ पेक्षा अधिक लहान मुलांचा समावेश होता. या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांसह इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेसाठी रुग्णालयाचे प्रमुख राजीव मिश्रा हे जबाबदार असल्याचे म्हटले होते. कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच मेंदूज्वर विभागाचे प्रमुख डॉ. काफील खान यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे. तर त्यांच्या या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.
