हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूमुळे मुंबई हळहळली. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आशिया खंडातल्या एक निष्णात डॉक्टरचा बळी गेल्याची टीका आता होऊ लागलीय. या प्रकरणाची चौकशी होणार आहे.
एल्फिन्स्टन स्टेशन परिसरातल्या मॅनहोलनजिक मंगळवारी अतिवृष्टीमुळे इथे रस्त्यावर पाणी साचलं होतं. पाण्याचा निचरा होण्यासाठी हे मॅनहोल महापालिकेतर्फे उघडं टाकण्यात आलं होतं. त्यात कोसळून डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले आणि तिसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह वरळीच्या समुद्रातच मिळाला. या प्रकरणानंतर महापालिकेवर चहूबाजूने टीका होऊ लागलीय. महापालिकेवर टीका होऊ लागल्यावर आता चौकशीचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी दिलेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल याप्रकरणी चौकशी करणार आहेत. 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आलेत.
डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यु प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आलेत.
डॉ. अमरापूरकर यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे मुंबईत हळहळ व्यक्त केली जातेय. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.
