दुर्गेशने प्रेयसीला पाठविला होता गळफासाचा फोटो

असोदा येथील दुर्गेश अनिल कोळी (वय २७) या तरुणाने शुक्रवारी गळफासाने केलेली आत्महत्या ही प्रेयसीने थट्टा केल्याने आलेल्या नैराश्यातून झाली असल्याची माहिती दुर्गेशच्या कुटुंबीयांनी रविवारी पोलिसांना दिली. आत्महत्येपूर्वी दुर्गेशने प्रेयसीला गळफासाचा फोटो व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविला होता. आत्महत्येस जबाबदार असलेल्या त्या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून दुर्गेशचे वडील व अन्य नातेवाइकांनी रविवारी तालुका पोलीस स्टेशन गाठले. या वेळी त्यांनी दोघांमध्ये व्हॉटस्अ‍ॅपवर झालेले ‘चॅटिंग’ही पोलिसांना दाखविले.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गेशचे शहरातील एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण होते. या तरुणीसोबत लग्न करण्याची त्याची इच्छा होती.
अचानक गेल्या आठवड्यात त्या मुलीला दुसरे स्थळ आले. त्या विषयावर दोघांमध्ये चॅटिंग झाले. मी खेड्यात येऊन काय करू, तुला नोकरी नाही, उद्योग नाही, असे ती तरुणी दुर्गेशला सांगत होती. यापूर्वीही दोन ते तीन तरुणांना त्या तरुणीने असेच फसविल्याचा आरोप दुर्गेशच्या नातेवाइकांनी केला आहे.
दरम्यान, प्र्रेयसीचे अन्य मुलांसोबतचे फोटो दुर्गेशच्या मोबाइलमध्ये आढळले आहे. आणखी काही पुरावे असून ते वेळप्रसंगी न्यायालयात सादर केले जातील, असे नातेवाइकांनी सांगितले. दुर्गेश याने काही दिवसांपूर्वी प्रेयसीचा वाढदिवस त्याच्या नव्या घरी साजरा केला होता.
दुर्गेशचे वडील अनिल आधार कोळी, मंगलसिंग नाना सोनवणे, कैलास कोळी, विशाल सोनवणे यांच्यासह अन्य नातेवाइकांनी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांची भेट घेऊन घटनेबाबत माहिती दिली.

आत्महत्या कर, पण मला फसवू नको
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करताना दुर्गेशने तिला मी आत्महत्या करतो आहे, असा मेसेज पाठविला. त्यावर तिने करायचे तर कर असे प्रत्युत्तर दिले. आता मी शेवटचा कॉल विशालला करतो, असेही त्याने म्हटले. ‘तू आयुष्यभर सुखी रहा, गुड नाईट’ असा मेसेज केला. त्यावर ‘हो। आय डोन्ट केयर’ असे म्हणत ’मला फसवू नको’ असेही त्या तरुणीने दुर्गेशला पाठविलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *