मध्य, पश्चिम आणि हार्बर या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागली.
मात्र, रविवारी मेगाब्लॉक घेतल्यानंतरही सोमवारची सुरुवात ही लोकलच्या बिघाडाने होत असल्याने प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या नावाने लाखोली वाहत असल्याचे चित्र प्रत्येक सोमवारी दिसत आहे.
बिघाड कायम असल्याने मेगाब्लॉक नक्की कशासाठी असा प्रश्न उपस्थित करुन मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनावर प्रवाशांनी ताशेरे ओढले.
गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेच्या बिघाडसत्रांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमवार ते शनिवार कायम बिघाडसत्रांना सामोरे जावे लागत असताना रविवारी मेगाब्लॉक असल्याने सुट्टीच्या दिवशी गर्दीला सामोरे जावे लागते.
नोकरदार वर्ग परिवारासोबत नातेवाईक आणि खरेदीला जाणे पसंत करतात. मात्र तुडूंब भरुन वाहणा-या लोकलमुळे या प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागतात. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाची सवय नसलेल्या प्रवाशांना याचा अधिक फटका बसतो.
रविवारी मध्य रेल्वेच्या भायखळा ते विद्याविहार या डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे डाऊन दिशेला जाणा-या सर्व गाडया जलद मार्गावरुन वळवल्या होत्या. या काळात आगाऊ सुचना देण्यात येत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत होता. धीम्या मार्गावर वाहतूक बंद असल्याने जलद मार्गावरील स्थानकांवर मोठया प्रमाणात गर्दी उसळली होती.
दरम्यान, प्रवाशांना सुविधा देण्याची पूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असताना मध्य रेल्वेची सेवा सततच्या गोंधळामुळे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असते. मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना योग्य सेवा देण्यात कुचराई होत असल्याने मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनावर प्रवासी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करीत आहेत.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेतल्याने नवी मुंबई, मानखुर्द, गोवंडी, चेंबुर टिळकनगर या परिसरातून मुंबईकडे येणा-या प्रवाशांची प्रचंड कोंडी झाली.
रस्ते वाहतूकी शिवाय कोणतीही पर्याय उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागला. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुर झाल्यानंतर स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे प्रवाशांना जीवघेण्या गर्दीचा सामना करावा लागला.

