औरंगाबादमधील गारखेडा परिसरातील कलावती चव्हाण बालक मंदिर शाळेत दोन मुख्याध्यापिकांचा वाद लहान मुलांच्या अंगाशी आला आहे. दोघींच्या वादात विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचे हात जायबंदी झाले असून दोघांना गंभीर दुखापत झाली. गुरूच्या प्रतिमेला मलिन करणारी ही घटना गारखेडा भागातील कलावती चव्हाण बालक मंदिर शाळेत घडली. या शाळेत एकाच इमारतीत माध्यमिक आणि प्राथमिक शाळेचे वर्ग भरतात. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात हे वर्ग चालवले जातात. माध्यमिक शाळेच्या मुख्यध्यापिका संध्या काळकर दहावीच्या विद्यार्थ्यांचा अधिक वेळ शिकवणी घेणार होत्या. पण त्या वर्गात प्राथमिक शाळेतील विद्यार्थी बसलेले होते. या वर्गात का बसला? या नाहक कारणावरुन त्यांनी लहान प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.
मारहाणीत दोन मुलांचे हात फ्रॅक्चर झाले तर इतर मुलांना जबर दुखापत झाली. त्यानंतर पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापिका संध्या काळकर यांना जाब विचारला. यावर त्यांनी मी माध्यमिक शाळेत शिकवते मला घटनेविषयी माहिती नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला. पालकांच्या आक्रमकतेनंतर त्यांनी आपण मुलांना वर्गातून बाहेर जा म्हटले. पण मारहाण केली नाही, असे सांगितले. यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी अवलगावकर यांनी सांगितले की, संध्या काळकर या मनमानी करत विद्यार्थ्यांवर राग काढतात. काळकर यांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्यानेच हा भयानक प्रकार घडला आहे. पालकांनी संध्या काळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
