वस्तू व सेवा करामुळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण असले तरी मॉलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मात्र याची झळ बसलेली नाही. मुंबईमधील बहुतांश मॉलमध्ये लागलेल्या पावसाळी विक्री योजनांकडे आकर्षित होणारा ग्राहक नवीन कर प्रणालीमुळे पाठ फिरवेल या भीतीने दुकानदारांनी कराचा भार ग्राहकांवर लादणे टाळले आहे. बिलामध्ये कराची रक्कम नमूद करण्यात आली असली तरी ती ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेली नाही. यामुळे सध्या तरी मॉलमधील ग्राहकावर नवीन कराचा बोजा पडलेला नाही.
जीएसटी लागू होण्याच्या आठवडाभर आधीच ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, जुलैमधील पावसाळी विक्री योजना सुरू असूनही रविवारी मॉलमध्ये ग्राहकांची विशेष गर्दी दिसत नव्हती. काही ठिकाणी अगदी ५० टक्के सूट असूनही दुकानांमध्ये मात्र कोणीही फिरकत नव्हते. मॉलमधील दुकानांमध्ये कपडे, चपला आणि सौंदर्यप्रसाधानांच्या किमतीमध्ये जीएसटीमुळे कोणताही विशेष फरक झालेला नाही. याउलट पावसाळी सवलती सुरू असल्यामुळे सर्वत्र १० ते ५० टक्क्यापर्यंतची सूट होती. जीएसटीच्या नव्या तंत्रज्ञानासाठी बहुतांश दुकानांच्या ऑनलाइन सेवा अद्ययावत झाल्या नसल्याने अनेक ठिकाणी लेखी स्वरूपातील बिल दिले जात होते. यामुळे मॉलमध्ये विशेष गर्दी नसली तरी बिलाच्या काऊंटरवर मात्र ग्राहकांना लेखी बिलासाठी ताटकळत राहावे लागत होते.
‘‘जीएसटी लागू होण्याआधी गेल्या आठवडाभरात ग्राहकांनी खूप खरेदी केल्यामुळे पावसाळी विक्री योजनांना अजून तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यातच आम्ही दर हजार आणि त्याखालील वस्तूवर जीएसटी लावायला लागलो तर ग्राहक आमच्याकडे फिरकणारच नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्राहकांसाठी कोणताही जीएसटी न लावता कंपनी हा भार उचलणार आहे,’’ असे चपलांच्या दुकानदाराने सांगितले.
जीएसटी लागू झाल्यामुळे मॉलमधील बहुतांश दुकानांमधील व्यवहारांमध्ये काही विशेष फरक झाल्याचे दिसून आले नाही. ‘‘आमच्या दुकानातील माल हा जीएसटी लागू होण्याआधी खरेदी केलेला आहे. सध्या तरी आम्ही किमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच जसे आधीही करासहित वस्तूची छापील किंमत ठरत होती. त्याचप्रमाणे इथूनपुढेही जीएसटीसह वस्तूची छापील किंमत ठरेल,’’ असे कपडय़ांच्या एका दुकानदाराने सांगितले.
* जीएसटीचा समावेश झालेल्या काही दुकानांच्या ऑनलाइन बिलावर जीएसटीच्या नंबरसह प्रत्येक वस्तूवरील कर नमूद केलेला दिसत होता. मात्र हा जीएसटी ग्राहकांकडून वसूल केला जात नव्हता.
* बिलावर मांडला असला तरी ग्राहकांकडून आत्ताच्या घडीला जीएसटी वसूल केला जाणार नाही, अशी भूमिका मॉलमधील जवळपास सर्वच दुकानदारांनी घेतली असल्याचे दिसून आले.
