प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपतिपदावरून लवकरच पायउतार होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. प्रणव मुखर्जी यांच्याबाबत बोलताना मोदी भावूक झाल्याचेही दिसले. ज्याप्रमाणे एखादा पिता आपल्या मुलाची काळजी घेतो. अगदी त्याचप्रमाणे मुखर्जी यांनी मला जपलं, असे भावूक विधान त्यांनी या वेळी केले. ‘प्रेसिडंट प्रणव मुखर्जी: ए स्टेट्समन’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी राष्ट्रपतींबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. मी खूप नशीबवान आहे. दिल्लीतील सुरूवातीच्या दिवसांत मला मुखर्जी यांची साथ लाभली. गेल्या तीन वर्षांत आम्ही अनेकवेळा भेटलो. पण प्रत्येकवेळी त्यांनी मला मुलासारखी वागणूक दिली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मोदी म्हणाले, हे मी खूप मनापासून सांगत आहे. प्रणवदा मला म्हणत, मोदीजी तुम्ही अर्धा दिवस आराम करायला हवा. तुम्ही इतकी धावपळ का करता. तुम्ही तुमच्या कार्यक्रमांची यादी कमी करायला हवी. आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मला म्हटलं होतं की, जय-पराजय हे चक्र कायम सुरू असते. परंतु, तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्यायला हवी. राष्ट्रपती म्हणून त्यांची ही जबाबदारी नव्हती. पण त्यांच्यातील ती माणसुकी होती. त्यांनी एका मित्राची काळजी घेतली. ते एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत, असे ते म्हणाले.
या वेळी प्रणव मुखर्जी यांनीही मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे कौतुक केले. दोघांचे विचार वेगळे राहिले. पण हे त्यांनी त्यांच्यापर्यंतच मर्यादित ठेवले आणि जवळच्या सहकाऱ्याप्रमाणे काम केले. याचा परिणाम त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंधावर होऊ दिला नाही.
