दीड वर्षीय विवानची हत्या गळा दाबून?

मालाडमध्ये सोमवारी संध्याकाळी विवान कांडू या दीड वर्षीय मुलाचा मृतदेह गोणीत आढळला. त्याची हत्या गळा दाबून केल्याचा संशय पोलिसांना असून, आता अधिकृत वैद्यकीय अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे.

विवानची हत्या कोणी आणि का केली असेल याची चौकशी पोलीस करत आहेत. विवानला गळा दाबून मारल्याचा प्राथमिक अंदाज तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही अधिकृत अहवाल पोलिसांना मिळालेला नसून विवानचा व्हिसेरा प्रयोगशाळेत जतन करून ठेवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. विवानच्या मारेकऱ्यांचा शोध लवकरात लवकर घेण्याचा दबाव पोलिसांवर आहे.

विवानचा काका आणि त्याच्या कुटुंबीयांची पोलीस चौकशी करत आहेत. मात्र हत्या करणारी व्यक्ती मृतदेह स्वत:च्या घराशेजारी ठेवणार नाही. त्यामुळे या प्रकरणी काकाचा हात असावा, असे प्राथमिकदृष्ट्या तरी वाटत नाही. मात्र तरीही त्याच्या चौकशीत विवानच्या हत्येशी संबंधित काही धागेदोरे सापडू शकतात, अशी शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे विवानचे आई-वडील मात्र पार ढासळून गेले आहेत. त्यांच्या शेजारीदेखील विवानच्या मृत्यूमुळे शोकाकुल वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *