शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची जोरदार चर्चा गेले अनेक दिवस सुरु आहे. स्मारकासाठी शिवाजी पार्क, महापौर निवासस्थान यासारख्या अनेक जागांची चर्चाही सुरु आहे. यातून अनेक वादही निर्माण झाले होते. मात्र, याचवेळी दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंचा एक भलामोठा पूर्णाकृती पुतळा तयार करण्याचं काम जोरात सुरु आहे. आता हा भल्या मोठ्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मुंबईतील ताडदेव भागातील एका कार्यशाळेत हा पुतळा तयार करण्यात आला आहे. नुकतीच या पुतळ्याची पाहणी शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. हा पुतळा तब्बल 23 फूट इतका उंच आहे. हा पुतळा संपूर्ण ब्राँझचा असणार आहे. सध्या या पुतळ्याचे मेणाचे आणि फायबरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र यामध्ये थोडेफार बदल असून त्यानंतर अंतिम कामासाठी हा पुतळा कोल्हापूरला पाठविण्यात येणार आहे. या पुतळ्याचे काम शिल्पकार यावलकर हे करीत आहेत. या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरेंनी देखील फोटो काढला आहे.
बाळासाहेबांनी आपल्या अमोघ वाणी, वक्तृत्व आणि खास ठाकरी शैली याच्या जोरावर कायमच उपस्थितांची मने जिंकून घेतली आहेत. बाळासाहेबांची खास शैली आणि भाषण करताना उभं राहण्याची विशिष्ट लकब अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचा हा पुतळा तयार करण्यात येत आहे. एकीकडे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेबाबत जरी वाद असला तरीही दुसरीकडे मुंबईत मात्र हा भलामोठा उभा राहणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.

