टिके-फुटकवाडीचा डोंगर ढासळतोय

टिके-फुटकवाडीचा डोंगर ढासळतोय

रत्नागिरी तालुक्यातील टिके-फुटकवाडीत भूस्खलन झाले आहे. येथील पाण्याच्या वहाळाची दिशा बदलल्याने डोंगराची माती ढासळू लागली आहे. भूस्खलनाने सहा घरांतील दहा कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे.

भूस्खलन झालेल्या ठिकाणाची तहसीलदार हेमंत साळवी यांनी गुरुवारी पाहणी केली. या वेळी तीन कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस देण्यात आल्या. याशिवाय भूस्खलन झालेल्या ठिकाणाचे भूशास्त्रज्ञांकडून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे तहसीलदार साळवी यांनी सांगितले.

जून महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले. रत्नागिरी तालुक्यात यापूर्वी शिरगाव बाणेवाडीत दरड कोसळल्याने आई-मुलीचा जीव गेला होता. आता तालुक्यातील टिके-फुटकवाडीत नव्याने भूस्खलनाची समस्या निर्माण झाली आहे. फुटकवाडी येथील वहाळानजीकची जमीन ढासळू लागली असून वहाळाकाठची झाडे कोसळू लागली आहेत.

टिके-फुटकवाडी येथे रेल्वेने टाकलेल्या मातीच्या भरावामुळे वहाळाची दिशा बदलल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पूर्वी वहाळ रहिवासी भागापासून बराच दूर होता. परंतु वहाळाच्या प्रवाहाच्या मार्गात रेल्वेने भराव टाकल्याने वहाळाची दिशा बदलली. वहाळाच्या पाण्याच्या मा-याने डोंगराची माती वाहून जाऊ लागली आहे. मागील आठवडाभरापासून टिके-फुटकवाडीत डोंगर हळूहळू ढासळू लागल्याची घटना सुरू झाली.

दोन दिवसांपूर्वी डोंगराचा मोठा भाग वहाळात कोसळला. मातीसह वहाळाच्या नजीकची झाडेही वहाळात कोसळली. भूस्खलन झालेल्या ठिकाणापासून घर अवघ्या वीस ते पंचवीस मीटर अंतरावर असल्याने टिके-फुटकवाडीतील तलाठी यांनी याबाबतची माहिती तहसीलदार रत्नागिरी यांना दिली. याच वेळी तलाठी यांनी टिके-फुटकवाडीतील बबन भानू वारीशे, बबन शिवराम वारीशे आणि रामचंद्र देवू वारीशे या तिघांना तात्काळ स्थलांतरित होण्याच्या नोटीस बजावल्या आहेत.

गुरुवारी भूस्खलन झालेल्या भागाला तहसीलदार हेमंत साळवी यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत तलाठी राम खडके आणि टिके सरपंच प्राजक्ता गोवेकर तसेच पोलीस पाटील उपस्थित होते. या वेळी धोका असलेल्या घरांना तहसीलदार यांनी भेट देऊन मुसळधार पाऊस असल्यास समाज मंदिर किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या.

जमिनीत पाणी मुरल्याने माती भुसभुशीत झाल्याने या ठिकाणी भूस्खलनाचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार यांनी भूवैज्ञानिक संस्थेमार्फत (जीएसआय) सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *