शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आग्रही असायचे. शिवसेनाप्रमुखांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब देऊन त्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार शनिवार, दिनांक ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात शिकणार्या ४०० विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टॅब देण्यात येणार आहेत.
शिवसेनेच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना टॅब देण्याची प्रक्रिया बालमोहन शाळेपासून सुरू होत आहे. शनिवारी बालमोहन विद्यामंदिरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणार्या ४०० विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होईलच शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभ्यास करण्याची पर्वणीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या आगळ्यावेगळ्या आणि संस्मरणीय सोहळ्याला बालमोहन विद्यामंदिरचे प्रमुख गिरीश रेगे, महापौर स्नेहल आंबेकर, राज्याचे शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, आरोग्यमंत्री दीपक सावंत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, सचिव आदेश बांदेकर, खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रात्यक्षिके दाखवणार
टॅबचा वापर कसा करावा, टॅब कसा हाताळावा याचे प्रात्यक्षिक याप्रसंगी दाखविण्यात येणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना टॅब हाताळणे सोपे जावे.
वंदे मातरम् आणि स्वातंत्र्याचा इतिहास
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त राज्यभर विविध सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. टॅबचे वितरण हाही याच उपक्रमाचा भाग आहे. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून देण्यात येणार्या या शैक्षणिक उपक्रमाच्या टॅबमध्ये अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबरच नवनीत एज्युकेशनचे ई-लर्निंग सॉफ्टवेअर, वंदे मातरम् आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची माहिती देण्यात येणार्या व्याख्यानाचा समावेश आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनाची पूर्ती

