ऐरोलीमधून बेपत्ता झालेल्या आठ वर्षांच्या फ्रान्शेला सोफिया फ्रान्सिस्को वाज या मुलीची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. मीरारोड-घोडबंदर परिसरात तिचा मृतदेह सापडला. या प्रकरणात क्लॅरेन्स नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो फ्रान्शेलाच्या मावशीचा पती आहे.
कौटुंबिक वादातून फ्रान्शेलाचं अपहरण करुन तिची गळा दाबून हत्या केल्याचं समजतं.
पोलिसांना आज सकाळी फ्रान्शेलाचा मृतदेह सापडला. या प्रकरणात मावशीचा पती क्लॅरेन्सला अटक केली आहे. पोलिसांना या नराधमावर आधीपासूनच संशय होता, मात्र काल रात्री त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसंच फ्रान्शेलाची हत्या केल्याची जागाही त्याने पोलिसांना दाखवली.
फ्रान्शेलाचे वडील आणि क्लॅरेन्स यांचे वाद होते. रागाच्या भरात क्लॅरेन्सने फ्रान्शेलाचं अपहरण केलं. त्यानंतर तासाभरातच तिची हत्या करुन मृतदेह मीरारोड-घोडबंदर रोड इथे टाकला.
दरम्यान, फ्रान्शेलाच्या मृतदेहावर अनेक जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर बलात्कार झाला आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत.
फ्रान्शेला सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. स्कूल बसमधून ती सोसायटीजवळ उतरल्याचं तिच्या मित्रांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर ती घरी पोहोचलीच नव्हती. मात्र आज तिचा मृतदेह सापडल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
फ्रान्शेला सोमवारी नेहमीप्रमाणेच सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान स्कूल बसमधून आपल्या सोसायटीजवळ उतरल्याचं तिच्या मित्रांनी सांगितलं. मात्र फ्रान्शेलाला एका इसमाने लाल कारमधून घेऊन गेल्याचंही त्याच दहा वर्षीय मित्राने सांगितलं होतं.
फ्रान्शेला ही न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये शिकत होती. ती नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर स्कूलबसमधून आली. ऐरोलीतील सेक्टर 8 मधील ‘एकवीरा दर्शन सोसायटी’जवळ फ्रान्शेला उतरली. पण त्याचवेळी एका लाल कारमधून तिला कोणीतरी घेऊन गेलं. त्यामुळे ती घरी पोहोचलीच नाही. संध्याकाळी 6.15 च्या सुमारास ही घटना घडली.
मात्र रात्री सातपर्यंत फ्रान्शेला घरी न परतल्यामुळे, तिच्या आईने चौकशी सुरु केली. शाळेतही याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणेच फ्रान्शेला स्कूलबसमधून घरी गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर फ्रान्शेलाच्या आईने स्कूलबस ड्रायव्हरकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनीही फ्रान्शेलाला घराच्या गेटजवळ सोडल्याचं सांगितलं.
यानंतर काही वेळातच परिसरात फ्रान्शेला बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याचवेळी शेजारीच राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाने फ्रान्शेलाला कोणीतरी लाल कारमधून घेऊन गेल्याचं सांगितलं. याप्रकारामुळे हादरलेल्या फ्रान्शेलाच्या आईने थेट पोलिस स्टेशन गाठून अपहरणाची तक्रार दाखल केली. अखेर आज सकाळी तिचा मृतदेह सापडला.

