कार अपघातात हेमा मालिनी जखमी चालकाला अटक

कार अपघातात हेमा मालिनी जखमी चालकाला अटक

बॉलीवूडची ड्रीमगर्ल, ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या गाडीला दौसा येथे आज रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात हेमा मालिनी जबर जखमी झाल्या आहेत. त्यांची मर्सिडीज गाडी समोरून येणार्‍या अल्टो कारवर आदळली त्यात अल्टोमधील एका चार वर्षीय चिमुरड्या मुलीचा जागीच अंत झाला असून अन्य चारजण जखमी आहेत.

हा अपघात काल रात्री ८.५५ वाजता झाला. पघाताची माहिती मिळताच घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिका-यांनी भेट दिली. अपघातात अल्टोमधील सीमा, हनुमान, शिखा आणि सोमित हे चौघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती दौसाचे जिल्हाधिकारी स्वरूप पवार यांनी दिली. हेमा मालिनी यांचा ड्रायव्हर अती वेगाने कार चालवत होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले तर अल्टो चुकीच्या दिशेने पुढे आल्याने अपघात झाला असे काहींचे म्हणणे आहे. दरम्यान, बेदरकार गाडी चालवल्या प्रकरणी हेमा मालिनी यांच्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून पोलिसांनी तपासासाठी दोन्ही कार जप्त केल्या आहेत.

हेमा मालिनी यांची प्रकृती स्थिर असल्याचे फोर्टिस हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने सांगितले. प्लास्टिक सर्जन डॉ. संदीपन मुकुल आणि न्युरो सर्जन हेमंत भारतीय यांच्या नेतृत्वाखाली एक टीम हेमा मालिनी यांच्यावर उपचार करत आहे. अपघात होताक्षणी एअरबॅग उघडल्यामुळे हेमा मालिनी यांना मोठी दुखापत झाली नाही. मात्र डोक्याच्या उजव्या बाजूला कपाळावर जोरात मार लागल्याने त्या भागातून सतत रक्त येत होते. हा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने उपाय सुरु केले आहेत. हेमा मालिनी यांच्या डोळा आणि नाकालाही जबर मार लागला आहे. हेमा मालिनींचे कुटुंबीय जयपूरमध्ये आज पोहोचणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *